Pages

Tuesday 3 May 2011

आई

भिँतीच्या पंखात
जेव्हा असते
आई नावाची ऊब
तेंव्हा उंबऱ्‍याबाहेरचं
माळरानसुध्दा असतं
सुंदर,आनंदी विश्व

तिच्या अंगाईत
आणि कुरवाळण्यात
असतात
हजारो लखो
जागतिक पुरस्कार
आपल्या मुर्खपणालाही
प्रदान केलेले
आणि रागातही
असतात
पेरलेली बीजं
कल्पवृक्षांची

आई असते सावली
व्यवहाराच्या उन्हातली
आई असते घरटं
थकल्या जीवाला रिझवणारं
आई असतो एक श्वास
आपला प्राण फुलवणारा
तिच्या प्रत्येक श्वासाच्या तडफडण्यात असतात
सदैव भोवती फिरणारी
आशिर्वादांची कवच कुंडले
आणि
प्राणाच्या निरांजनानं
उजळत असतो रस्ता
जीवनाचा

खुशाली इच्छित
अथांग अवकाश सुद्धा
जेव्हा येतं घरात
आईची माया बघुन
आपल्या छोटे पणाला
लाजून जातं
लाजून जातं.